आयुष्यावर बोलू काही.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आयुष्यावर बोलू काही.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१३

सलील, संदीपच्या "आयुष्यावर बोलू काही'ची दशकपूर्ती.


कलाकार म्हणून ते दोघे एकमेकांना ओळखत होते... एका कार्यक्रमात भेट झाली... त्यानंतर पुन्हा असेच भेटले. मैत्रीचे, विचारांचे सूर जुळले. एकाने शब्द लिहिले, त्यावर दुसऱ्याने चाल केली. तर कधीकधी बांधलेल्या चालीवर शब्द साकारले गेले. मग, सहजपणाने रचलेल्या गाण्यांचा कार्यक्रम करायचा ठरले आणि रसिकांसमोर आला... "आयुष्यावर बोलू काही'. संदीप खरे, सलील कुलकर्णी यांचा हा कार्यक्रम गेली दहा वर्षे देश-परदेशातील रसिकांनाही आपलासा वाटला. आनंद, सुख-दु:ख, हुरहूर, प्रेम, वात्सल्य अशा किती तरी भावना कविता, गीत, संगीतातून अनुभवण्याचा एक सहज सुंदर प्रवास ठरला.

मराठी गाण्यांपासून युवा पिढी दूर गेली आहे, अशा चर्चा रंगत असतानाच हा कार्यक्रम आला आणि मराठी गाण्यांचे एक वेगळे दालनच खुले झाले. पण, मराठीत आता काही वेगळे देऊ, या विचाराने हा कार्यक्रम सुरू झाला नाही; तो अत्यंत सहजतेने सुरू झाला आणि सहजतेनेचे सादर केला गेला. त्यामुळेच इतकी वर्षे रसिकांना भावला. कार्यक्रमाच्या यशाचे हे रहस्य सलील आणि संदीप दोघांनीही नमूद केले. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ""कोणताही अभिनिवेश न आणता आम्ही अगदी सहज कार्यक्रम करतो. गाणी-कवितांबरोबर गप्पाही होतात- आपापसातही आणि रसिकांबरोबरही. हाच साधेपणा, प्रामाणिकपणा रसिकांना भावतो. त्यामुळे कार्यक्रमाला "ग्लॅमर' देण्यासाठी वेगळा अट्टहास करावा लागला नाही. मोठा वाद्यवृंद, अधिक कलाकार हे सगळे आम्ही टाळले. पहिलाच कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला आणि तोच अनुभव दहा वर्षे मिळाला. सतत नवनवीन गाणी सादर केल्याने सतत ताजा, नवीन राहिला.''

गाण्यांनी रसिकांच्या मनाला हात घातला, दुखऱ्या कोपऱ्यांवर फुंकर मारली. त्यामुळेच कार्यक्रमाला परत परत येणारे अनेक रसिक आहेत. ""गाणी ऐकताना रसिकांना ती त्यांचीच वाटतात. "दूरदेशी गेला बाबा...' "नसतेस घरी तू जेव्हा...' अशी अनेक गाणी ऐकून रसिकांच्या डोळ्यांत पाणी आले. अनेकांनी आपले जॉब प्रोफाईल बदलल्याचेही सांगितले. कुटुंबातील ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच भावत असल्याने रसिक पुन्हा पुन्हा येतात,'' असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

दशकपूर्तीचा आनंद साजरा करण्यासाठी "सकाळ'ने शनिवारी (ता. 3) बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी सहा वाजता सहा तासांचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे

"आयुष्यावर बोलू काही...' दशकपूर्ती सोहळा
शनिवार, ता. 3 ऑगस्ट
बालगंधर्व रंगमंदिर
सायं. 6 ते रात्री 12.30 (एका तासाच्या मध्यंतरासह)

शनिवार, २० एप्रिल, २०१३

मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !

मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
’हॅलो, हॅलो’ बोलतंय्‌ कोण ?

"आमचे नाव खेलाशेठ, डोंगराएवढे आमचे पेट
विकत बसतो साजूक तूप, साला चापून खातो आम्हीच खूप
तुम्ही कोण ? काय तुमचे नाव ? बोला झटपट कुठलं गाव ?"

"कसले नाव नि कसला गाव, राँग नंबर लागला राव !"

मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
’हॅलो, हॅलो’ बोलतंय्‌ कोण ?

"लक्षुमबाई मी जोशांघरची, चोरून खाते अंडाभुर्जी
वरती कपभर दूध अन्‌ साय, घरात आत्ता कोनी नाय
तुम्ही कोण ? काय तुमचे नाव ? बोला झटपट कुठलं गाव
?"

"कसले नाव नि कसला गाव, राँग नंबर लागला राव !"

मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
’हॅलो, हॅलो’ बोलतंय्‌ कोण ?

"मी तर आहे अट्टल चोर, चंद्राची मी चोरून कोर
झालो अंधारात पसार, तारे उरले फक्त हजार
तुम्ही कोण ? काय तुमचे नाव ? बोला झटपट कुठलं गाव ?"

"कसले नाव नि कसला गाव, राँग नंबर लागला राव"

मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
’हॅलो, हॅलो’ बोलतंय्‌ कोण ?

"ढगामधून बोलतोय बाप्पा, चल मारू थोड्या गप्पा"

"बाप्पा बोलतोयस, मग जरा थांब
सगळ्यात आधी एवढं सांग
कालच सांगत होता पप्पा, तिकडे आलेत आमचे अप्पा
एकतर त्यांना धाडून दे, नाही तर फोन जोडून दे
तुला सांगतो अगदी स्पष्ट, अर्धीच राहिली आमची गोष्ट
त्यांना म्हणाव येऊन जा, गोष्ट पुरी करून जा
म्हणले होते जाऊ भूर्र, एकटेच गेले केवढे दूर !
Detail सगळा सांगतो पत्ता, तिकडे पाठव आमचे अप्पा
बाप्पा.. बाप्पा बोला राव, सांगतो माझं नाव न्‌ गाव"

कसले नाव नि कसले गाव, राँग नंबर लागला राव !

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो...

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो !

मी जुनाट दारापरी किरकिरा, बंदी
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो
तो लंघून चौकट पार निघाया बघतो !

डोळ्यांत माझिया सूर्याहूनी संताप
दिसतात त्वचेवर राप, उन्हाचे शाप !
तो त्याच उन्हाचे झगझगीत, लखलखते
घडवून दागिने सूर्यफुलांवर झुलतो !!

मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो !

मी आस्तिक ! मोजत पुण्याईची खोली
नवसांची ठेवून लाच, लावतो बोली !
तो मुळात येतो इच्छा अर्पून साऱ्या
अन्‌ 'धन्यवाद' देवाचे घेऊन जातो !!

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार
लपतो न परी चेहरा आत भेसूर !
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही
त्या शामनिळ्याच्या मोरपिसापरी दिसतो !!

वहिनीसाहेब

कुळाचे कौतुक जीवांचा आधार
सुखाचे आगर मायेचे माहेर
देह तुळशीचा वसा चंदनाचा
शब्द करुणेचा शोधी ओठांवर
समई होऊन संसारी नांदते
पक्षीण होऊन पिलांना पाहते
गावाची माऊली वडाची सावली
पोळत्या जीवांना पोटाशी धरते
वहिनीसाहेब !

शुक्रवार, २० जुलै, २०१२

आयुष्य म्हणजे माझा सवंगडी हा अफाट सह्याद्री ...

आयुष्य म्हणजे एक सांजवेळ , नानाचा अंगठा, क्षितिजावरचा सूर्य आणि जिवलग मित्र....
आयुष्य म्हणजे रायगडचे टकमक टोक, अंगाला झोंबणारा गार वारा आणि निस्तब्धता....
आयुष्य म्हणजे मेंगाई देवीच मंदिर, पौर्णिमेची रात्र आणि शाळेतले सवंगडी....
आयुष्य म्हणजे जीवाधानचा कातळकडा,मधेच अडकलेले तुम्ही आणि मित्राने स्वतच्या हातावर पेललेला तुमचा भर....
आयुष्य म्हणजे राजांची समाधी आणि तुमची शून्यातली नजर....
आयुष्य म्हणजे पावनखिंड , हातात उचललेली मुठभर माती आणि डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा....
आयुष्य म्हणजे एक रात्र , चार मित्र , नानेघाटातील गुहा आणि मुगाची गरमागरम खिचडी....
आयुष्य म्हणजे पहाटेची वेळ , कळसूबाईचा पायथा आणि चहाचा मंद सुवास....
आयुष्य म्हणजे नळीची वाट , कोकणकडा आणि तारामती मंदिर....
आयुष्य म्हणजे बालेकिल्ल्यावरचा सूर्योदय, लंगोटी मित्र आणि मित्राने दिलेली "क्षत्रीयाकुलावंत ....." आरोळी....
आयुष्य म्हणजे वासोटा , चुकलेली वाट आणि मावळतीला जाणारा सूर्य....
आयुष्य म्हणजे जंगलातून जाणारी वाट, पानांची होणारी सळसळ आणि कॅमेरा ON करेपर्यंत दिसेनासे होणारे नागराज....
आयुष्य म्हणजे जंगली जयगडचा चढ , पाण्याच्या संपलेल्या बाटल्या आणि घशाला पडलेली कोरड....
आयुष्य म्हणजे माझे शिवराय ....
आयुष्य म्हणजे माझे शंभूराजे ....
आयुष्य म्हणजे माझ्या जिजाऊ ....
आयुष्य म्हणजे माझा सवंगडी हा अफाट सह्याद्री ....

बुधवार, २७ जून, २०१२

बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग


आई आई ये ना जरा… बाबाकडे बघ
बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग !
बाबा असा बघायला दिसे ना गं बरा
आळीमिळी गुपचिळी… पडलेला वारा !
हले नाही… डुले नाही… जणू काही फोटो
आवाजही त्याला माझा लांबूनच येतो !
उभा तर उभा आणि बसे तर बसे
हसे तेव्हा अजूनच कसनुसा दिसे !
विचारले- “बाबा, काय पाहतोस सांग?!’
बघे म्हणे- “आभाळाचा लागतो का थांग-
काय सांगू पोरी तुला कळणार नाही
आभाळ न आले हाती; जमीनही नाही 

चहूकडे कोंडलेल्या जगण्याच्या दिशा
हाती नाही काम; गाडा चालायचा कसा !
घोडा झाला तरी काही शिकला ना बाबा
विकायच्या जगामध्ये टिकला ना बाबा !”
आणि मग उठुनिया कुशीमध्ये घेतो
ओले डोळे पुसुनिया ओली पापी घेतो…
घाबरतो जीव; बाबा असे काय बोले?
चित्रातले रंग त्याच्या जसे ओले ओले…
चेहऱ्याचा रंग त्याच्या सांग कुठे गेला ?
हसणारा बाबा कुणी पळवून नेला?….
आई आई ये ना जरा बाबाकडे बघ
बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग….!!
- अग्गोबाई ढग्गोबाई २, संदीप खरे

सोमवार, १८ जून, २०१२

मी मोर्चा नेला नाही


मी मोर्चा नेला नाहीमी मोर्चा नेला नाही, मीसंपही केला नाहीमी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघतानाकुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढतानामी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हातो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथेपावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पानेपण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली नाहीकुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही
धुतलेला सातिव सदरा, तुटलेली एकच गुंडीटकलावर अजून रुळते, अदृश्य लांबशी शेंडीमी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालोमी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही
मज जन्म फ़ळाचा मिळता, मी केळे झालो असतोमी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतोमज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाहीमी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही

प्रत्येकाची रात्र प्रत्येकाची रात्र थोडी आतूनआतून वेड़ी..



प्रत्येकाची रात्र प्रत्येकाची रात्र थोडी
आतूनआतून वेड़ी

प्रत्येकाच्या, पायामधे एक तरी बेडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी

प्रत्येकाच्या मनातून कुठला तरी राग
प्रत्येकाच्या चंद्रावर कसला तरी डाग

प्रत्येकाच्या, मनातून काहीतरी खोडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी

प्रत्येकाच्या मनामधे स्वप्नातला देश
प्रत्येकाच्या तळव्याला नशिबाची रेष
प्रत्येकाच्या, प्रत्येकाची छाती करी रोज तडजोड़ी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी

फिटावित जरतारी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी
प्रत्येकाच्या, पानी कशी रोज खाडाखोडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी..

शनिवार, ९ जून, २०१२

आठवतं तुला ?



आठवतं तुला ?
आठवतं तुला त्या भेटीत
रिमझिम सरींनी छेडलं होतं .
भर दुपारी मला जणू
चांदण्याने वेढलं होतं .

आठवतं तुला त्या भेटीत
श्रावण धुंद बहरला होता .
ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने
ओला देह शहारला होता .

आठवतं तुला त्या भेटीत
दोघे व्याकुळ झालो होतो .
तुझा गंध वेचता वेचता
मीही बकुळ झालो होतो .

आठवतं तुला त्या भेटीत
भावनांनी कविता रचली होती.
माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.

आठवतं तुला त्या भेटीत
आणखी काय घडलं होतं ?
मला स्मरत नाही पुढचं
बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं .

देवा, मला रोज एक अपघात कर



देवा, मला रोज एक अपघात कर

आणि तिच्याच हातांनीच ...
आणि तिच्याच हातांनीच ...जखमा या भर

देवा, मला रोज एक अपघात कर ..देवा, मला रोज एक अपघात कर ..


कधीतरी कुठे तरी बसावी धडक 
कळ मला यावी तिला कळावी तड़क
घायाळाला मिळो एक घायाळ नजर.. हाय ..
देवा, मला रोज एक अपघात कर

अपघाती सोंग माझे वाटावे खरे
तिला येता प्रेम मला वाटावे बरे
दवा दारू मधे .. कुठे असतो असर
देवा, मला रोज एक अपघात कर

खरी व्यथा तेव्हा मग सांगेन तिला
विचारेल जेव्हा, कुठे दुखते तुला?
जरा डावीकडे.. जरा पोटाच्या या वर
देवा, मला रोज एक अपघात कर

टेकवता छातीवर डोके एकवार
ठोका घेई झोका, उडे आभाळाच्या पार
व्यथांचाच काय, पड़े जगाचा विसर
देवा, मला रोज एक अपघात कर

देवा, मला रोज एक अपघात कर

आणि तिच्याच हातांनीच जखमा या भर
देवा, मला रोज एक अपघात कर ..

शुक्रवार, ८ जून, २०१२

दमलेल्या बाबाची ही कहाणी


"अग्गोबाई-ढग्गोबाई" या अल्बममधल्या "दूर देशी गेला बाबा" या स्वतःच्याच गाण्याला उत्तर म्हणून वडीलांच्या भूमिकेतून "दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला" हे गाणं संदीपनी नुकतंच लिहीलेलं आहे. "आयुष्यावर बोलू काही" च्या५०० व्या भागात संदीप-सलीलनी हे गाणं पहिल्यांदा सादर केलं.

(सलीलचा आवाज) पद्य:
कोमेजून निजलेली एक परी राणी
उतरले तोंड,डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....

आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा तरी लोकलची वारी
रोज सकाळीच राजा निघताना बोले
गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परि येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळी
खर्‍याखुर्‍या परीसाठी गोष्टीतली परी
मांडीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....

(संदीपचा आवाज) गद्य:
ऑफिसात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे
आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी

(सलीलचा आवाज) पद्य:
उधळत खिदळत बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हसूनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....

(संदीपचा आवाज) गद्य:
दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ-मऊ दूध भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी

(सलीलचा आवाज) पद्य:
कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला
आईपरी वेणी फणी करतो ना तुला
तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा
तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची या कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....

(संदीपचा आवाज) गद्य:
बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्‍त,जवळ पहायचंच राहिलं

(सलीलचा आवाज) पद्य:
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो
बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....