शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१३

सलील, संदीपच्या "आयुष्यावर बोलू काही'ची दशकपूर्ती.


कलाकार म्हणून ते दोघे एकमेकांना ओळखत होते... एका कार्यक्रमात भेट झाली... त्यानंतर पुन्हा असेच भेटले. मैत्रीचे, विचारांचे सूर जुळले. एकाने शब्द लिहिले, त्यावर दुसऱ्याने चाल केली. तर कधीकधी बांधलेल्या चालीवर शब्द साकारले गेले. मग, सहजपणाने रचलेल्या गाण्यांचा कार्यक्रम करायचा ठरले आणि रसिकांसमोर आला... "आयुष्यावर बोलू काही'. संदीप खरे, सलील कुलकर्णी यांचा हा कार्यक्रम गेली दहा वर्षे देश-परदेशातील रसिकांनाही आपलासा वाटला. आनंद, सुख-दु:ख, हुरहूर, प्रेम, वात्सल्य अशा किती तरी भावना कविता, गीत, संगीतातून अनुभवण्याचा एक सहज सुंदर प्रवास ठरला.

मराठी गाण्यांपासून युवा पिढी दूर गेली आहे, अशा चर्चा रंगत असतानाच हा कार्यक्रम आला आणि मराठी गाण्यांचे एक वेगळे दालनच खुले झाले. पण, मराठीत आता काही वेगळे देऊ, या विचाराने हा कार्यक्रम सुरू झाला नाही; तो अत्यंत सहजतेने सुरू झाला आणि सहजतेनेचे सादर केला गेला. त्यामुळेच इतकी वर्षे रसिकांना भावला. कार्यक्रमाच्या यशाचे हे रहस्य सलील आणि संदीप दोघांनीही नमूद केले. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ""कोणताही अभिनिवेश न आणता आम्ही अगदी सहज कार्यक्रम करतो. गाणी-कवितांबरोबर गप्पाही होतात- आपापसातही आणि रसिकांबरोबरही. हाच साधेपणा, प्रामाणिकपणा रसिकांना भावतो. त्यामुळे कार्यक्रमाला "ग्लॅमर' देण्यासाठी वेगळा अट्टहास करावा लागला नाही. मोठा वाद्यवृंद, अधिक कलाकार हे सगळे आम्ही टाळले. पहिलाच कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला आणि तोच अनुभव दहा वर्षे मिळाला. सतत नवनवीन गाणी सादर केल्याने सतत ताजा, नवीन राहिला.''

गाण्यांनी रसिकांच्या मनाला हात घातला, दुखऱ्या कोपऱ्यांवर फुंकर मारली. त्यामुळेच कार्यक्रमाला परत परत येणारे अनेक रसिक आहेत. ""गाणी ऐकताना रसिकांना ती त्यांचीच वाटतात. "दूरदेशी गेला बाबा...' "नसतेस घरी तू जेव्हा...' अशी अनेक गाणी ऐकून रसिकांच्या डोळ्यांत पाणी आले. अनेकांनी आपले जॉब प्रोफाईल बदलल्याचेही सांगितले. कुटुंबातील ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच भावत असल्याने रसिक पुन्हा पुन्हा येतात,'' असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

दशकपूर्तीचा आनंद साजरा करण्यासाठी "सकाळ'ने शनिवारी (ता. 3) बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी सहा वाजता सहा तासांचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे

"आयुष्यावर बोलू काही...' दशकपूर्ती सोहळा
शनिवार, ता. 3 ऑगस्ट
बालगंधर्व रंगमंदिर
सायं. 6 ते रात्री 12.30 (एका तासाच्या मध्यंतरासह)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा