कुठलाही प्रवास असो अन कुठलंही गंतव्य असो, शेवटचा टप्पा आपल्याला नेहमीच खूप मोठा आणि लांब वाटतो ...
कधी एकदाचं आपल्या नियोजित गंतव्यावर पोहोचतो असं सतत वाटत रहातं ...
त्याचं मुख्य कारण म्हणजे प्रवासात येणारा थकवा ...
गर्दीतून वाट काढतांना झालेली धावपळ, आठवणींच ओझं वाहतांना झालेली दमछाक ...
समाजात 'जागा' मिळवण्यासाठी होणारी धडपड, सततच्या प्रवासाने अकडलेलं शरीर ...
ह्या सगळ्या गोष्टींचा थकवा ...
जितका शारीरिक थकवा त्याहून कैकपटीने जास्त मानसिक थकवा ...
अन त्याहून त्रासदायक गोष्ट म्हणजे साथ सोडून जाणारे सहप्रवासी ...
लोभ, स्वार्थ, हेवा, मत्सर अश्या गोष्टींना पाहून पाहून बघण्याची शक्तीच गमावलेले डोळे ... शिव्या, खोटी आश्वासनं अश्या गोष्टींमुळे ऐकण्याची ताकद गमावलेले कान, आठवणींच्या अतिमाऱ्याने बधीर झालेला मेंदू ... सगळे जण एक एक करून आपली साथ सोडत जातात ...
आयुष्याच्या प्रवासाच्या या शेवटच्या टप्प्यात शेवटपर्यंत आपली साथ देणारी सहप्रवासी एकच ...
अन ती म्हणजे "व्याधी" ...
चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या सगळ्यांनाच दिसतात पण मनावर पडलेल्या सुरकुत्या ह्या ज्याच्या त्यालाच माहित असतात ...
अन त्या ज्याच्या त्याला निभवाव्या सुद्धा लागतात !!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा