शुक्रवार, ६ जुलै, २०१२

उरल्या सुरल्या थेंबाची एक आठवण शितलतेच्या चांदण्यात आठवणीचे स्मरण..



आयुष्याच्या रहाटगाडग्यामध्ये कोणी किती वरवरचे आधार शोधले वा परिस्थितिशी झुंजायचे ठरवले सगळे उपाय तात्पुरते, तेवढ्यापुरतेच असतात…. आत, मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी मनाला सतत भेडसावणारी अनामिक भीतिची भावना कधीच सरत नाही…. या वस्तुस्थितिच्या जाणीवेतून हा उद्गार आहे… “भय इथले संपत नाही...!!!

सगळा अहंकार मुळातुन उखडून टाकणारी. अगदी एखाद्या झाडाच्या मुळाशी रुजलेले बीयाणे, त्याचे आधी लहानसे रोप होते, मग त्
या मोठ्या झाडाचा आधार घेत त्याच्या सावलीत ते हळुहळु बहरते, मोठे होते. मोठे झाले की पुन्हा ते त्याच्या तळाशी रुजु पाहणार्‍या बीयाण्याला आधार देते. आपलं आयुष्यही असंच असावं.....

एकदा का परतीचे वेध लागले की आपोआपच डोळ्यासमोर परमेशाची मुर्ती दिसू लागते, नकळत पावले देवळाकडे वळतात. डोळे मिटून हात जोडून आपण त्याच्या समोर नतमस्तक होतो आणि मग नकळत त्याच्या सर्वसमावेषकतेचा साक्षात्कार होतो. अगदी ‘खांब फोडून’ बाहेर आलेल्या नरसिंहासारखा तो सर्वत्र आहे याची जाणिव होते......

जेव्हा त्या त्या ईशाच्या सर्चसमावेषकतेची खात्री पटलेली असते. त्या द्वैत्-अद्वैताचे अंतर मिटवणार्‍या क्षणी “तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता” अशी भावना मनात निर्माण होणे साहजिक आहे. अशा वेळी त्या सर्वश्रेष्ठ शक्तीशी समरस होण्याचा तो क्षण आपल्याला आपल्या सुक्ष्मतेची, आपल्या त्याच्याशी एकरुपतेची जाणीव करुन देणारा असतो. त्या ‘मी’ चा विसर पाडणार्‍या क्षणी आपली अवस्था त्या एका सुक्ष्म थेंबासारखीच असते.

एकदा का ‘मी’ पासून सुटका झाली की एकप्रकारची मनःशांती अनुभवाला येते. संध्याकाळी फुलणार्‍या शांत, स्निग्ध कमलपुष्पाप्रमाणे मन नितळ होवून जाते. सगळ्या षडविकारांपासुन मुक्त अशी ही अवस्था म्हणजे आत्मिक, अध्यात्मिक श्रुंगाराची एक विलक्षण अवस्थाच जणू. तो मोक्षाचा क्षण असतो, स्वतःला विसरण्याचा क्षण असतो. स्वतः थेंबरुपाने त्या क्षितीजरुपी सागरात मिसळून जाताना त्या सुशांत, भव्य , अथांग आसमंताची सर्वसमावेषक निळाई अनुभवास येते आणि कदाचित तोच क्षण मुक्तीचा असतो. आता देहाचे आकर्षण सरलेले असते, तो केवळ एक निमीत्तमात्र उरलेला. स्वतःला पुर्णपणे विसरुन त्या अथांग पसरलेल्या निळाईत एकरुप व्हायचे......

जोपर्यंत आपण मानवी देहाच्या आसक्तीतुन बाहेर पडत नाही, जोपर्यंत
भौतिकाची आस संपत नाही तोपर्यंत या नश्वर देहातील इंद्रीयांच्या संकुचित
आणि मर्यादित पातळीवरुन निर्माण होणार्‍या भावनेला, जाणिवेला नीट पाहीलं
तर त्यात फक्त दु:खाचीच जाणिव जास्त प्रकर्षाने होते. अशा अवस्थेत वाचेचे
इंद्रीयच काय, पण काया वाचा मने आपण अगदी त्या परमेशापुढेही केवळ
दु:खाचेच रडगाणे गात राहातो. पण एकदा का हे द्वैत सरलं, एकदा का त्या
परमेशाशी एकरुपता लाभली की उरतं ते निर्विवादपणे मन:शांती, समाधान देणारं
‘कैवल्याचं चांदणं’, आणि मागे उरते ती केवळ स्वतःच्या सुक्ष्मतेची एक
आठवण. ते स्मरण मग कायम चांदण्याची शीतलताच वाटत राहतं....
आणि मग वाटते .......

उरल्या सुरल्या थेंबाची एक आठवण
शितलतेच्या चांदण्यात आठवणीचे स्मरण..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा