बुधवार, ४ जुलै, २०१२

कधी कधी वाटतं.. कुठेतरी खूप दूर निघून जावं...



कधी कधी वाटतं.. कुठेतरी खूप दूर निघून जावं...
फक्त मी आणि तुझी आठवण ... याव्यतिरिक्त तिथे दुसरं कोणीही अन काहीही नसावं ...

लुडबुड नसावी त्या बेधुंद वाऱ्याची सुद्धा ... तुझ्या मोकळ्या केसांपासून त्याने जरा लांबच रहावं ...
फक्त माझाच हक्क असावा तुझ्या रेशमी केसांवर ... अन मला तो हक्क गाजवतांना त्याने लांबूनच पहावं ...

विरह-अग्नी काय असतो हे जरा त्या भामट्याला ही कळावं ...
नेहमी मला जाळत आलाय तुझ्या केसांशी सहज खेळून जो ... आज मला तेच करतांना पाहून थोडंसं त्यानेही जळावं ...

तु माझ्या डोळ्यात अन मी तुझ्या डोळ्यात नजर घालून तासनतास बसुन रहावं ...
तु डोळ्यानेच 'माझ्या' मनातलं बोलत रहावं अन मी डोळ्यानेच 'तुझ्या' मनातलं ऐकत रहावं ...

त्या स्वप्नांच्या जगातच का होईना पण मीही कधी तुझ्यावर उगीच रुसावं ...
रुसावं फक्त मी तुझ्यावर .. परिस्थितीने तुझ्यावर कधीच नाही रुसावं ...

माझ्यावरच येऊन थांबावे सगळे खेळ परिस्थितीचे... तिच्या जाळ्यात नेहमी मीच फसावं ..
तु नेहमी फक्त हसत रहावं अन तुझ्या निरागस हास्याकडे पाहून मीही आपलं जगत रहावं ...

कधी कधी वाटतं ... कुठेतरी खूप दूर निघून जावं...
फक्त मी आणि तुझी आठवण ... याव्यतिरिक्त तिथे दुसरं कोणीही नसावं !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा